अस्वस्थ

तुम्हाला कधी उगीचच खूप अस्वस्थपणा जाणवतो का? म्हणजे वरवर कारण काहीच नसतं. सगळं व्यवस्थित चालू असतं. म्हणजे रोजच्या प्रमाणे आपण ऑफिसला येतो किंवा आपल्या कामाला लागतो. मग ते काम फक्त स्टॉक मार्केट स्टडी करायचं ही असो. 

सकाळपासून तसं सगळं म्हणजे मॉर्निंग वॉक,  सौरभ बोथरा,  लिंबू पाणी,  चहा-कॉफी,  हलका नाष्टा,  पूजा,  जप, मेडिटेशन, सगळं रूटीनमध्ये चालू असतं. एखाददुसरा फोन येतो, आपण काही फोन करतो. वाटेत ट्रॅफिक नेहमीसारखंच असतं. तसाच एखादा ट्रक बंद पडलेला असतो, तसाच एखादा फॉर्च्युनरवाला आपल्याला साईडला दाबून ओव्हरटेक करून गेलेला असतो.  काही नवीन नाही.  

Whatsapp चा रतीब नेहमीप्रमाणेच चालू असतो. आपणही आपल्या पध्दतीने काही मेसेजला अंगठा दाखवतो (चांगल्या अर्थाने), काही फॉरवर्ड करतो, शिवाय आपल्यातर्फे या अब्जावधी मेसेजमध्ये आपल्या काही मेसेजेसची आहुती देतो.  

ऑफिसमध्ये आपण to do list बनवतो,  किंवा मनाशी उजळणी करतो आणि कामाला लागतो. असं नाही की काम आपल्या आवडीचं नसतं. आपलं नेहमीचं, आवडीचं काम असतं.  कुणाचा एखादा चांगला सेल होतो.  कुणाची scrip एकदम 3 टक्क्याने वाढते,  without disturbance कोडिंग होतं, कसलाही व्यत्यय न येता असेंब्ली लाईन्स पाहिजे तसा आऊटपुट देतात.   म्हणलं तर सगळं सुरळीत चालू असतं.  पण एवढं सगळं असूनही आपलं हृदय की मन कि मेंदू अस्वस्थच असतो.  

या अस्वस्थपणाचं कारण कळत नाही.  त्यावर उपाय सापडत नाही. काम सुचत नाही असं नाही, काम सुचत राहतं,  आपण करत राहतो. पर दिल नही लगता. 

एकीकडे हा अस्वस्थपणा उंदरासारखा मनाला कुरतडत राहतो. मग आपण पिक्चरचे बेत बनवतो, आउटिंगचे बेत बनवतो. बाकी काही नाही, तर नुसतेच बसायचे बेत बनवतो.  काही फरक पडत नाही. अस्वस्थता तशीच राहते.  

पूर्वी एक बरं होतं. शरीराचे आजार वेगळे, आणि मनाचे आजार वेगळे. असं सोपं होतं. आता जरा वेगळं झालंय.  शरीराचे आजार मनावर परिणाम करतात आणि मनाचे आजार शरीरावर परिणाम करतात. अशी नवीन थेअरी आहे. 

पण केंव्हा आपण याच्या खरंच खोलात जाऊ, म्हणजे डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ञाकडे जाऊ, जेव्हा प्रॉब्लेम खूप मोठा असेल. अश्या छोट्या प्रॉब्लेमचं करायचं काय? 

मला फार पूर्वी, म्हणजे 40 एक वर्षांपूर्वी Readers Digest मध्ये वाचलेला एक विनोदी लेख आठवतो.  त्यात तो लेखक सांगतो की, ‘Half crisis’ असेल तर मी दि:मूढ  होतो, काय करावं ते कळत नाही. Full crisis झाला की सोपं असतं. आपली action काय ते ठरलेलं असतं. म्हणजे आग लागली तर फायर ब्रिगेडला फोन करता येतो पण आग लागणार आहे असं नुसतं वाटलं आणि घरभर शोधून काही सापडलं नाही तर काय करणार? 

तर हा अस्वस्थपणा… Half crisis. 

असा तुम्ही कधी विचार केलाय का,  कि या अस्वस्थपणाचा संदर्भ किंवा कारण कदाचित तुमच्या मनात नाही तर  कुठेतरी बाहेर असू शकेल? हे भलतंच नाहीये. तुम्ही कधी ‘Noetic science ‘ हे नाव ऐकलंय? हे असं शास्त्र आहे की जे Human consciousness (म्हणजे ‘मी’ ही जाणीव), ज्ञान, आणि आपले आणि या विश्वामधील कनेक्शनस याचा अभ्यास करते. हि ‘मी’ ही  जाणीव नक्की काय आहे? Noetic science म्हणते की आपली जाणीव, consciousness हा आपल्या डोक्यात किंवा मेंदूत नसून कुठेतरी बाहेर आहे, किंवा जगभर आहे. हे वाचायला विनोदी किंवा अंधश्रद्धा वाटेल पण याचे पुरावे  जागोजागी आहेत.  

तुम्ही कधी माशांचा थवा पोहताना पाहिलाय? तो संपूर्ण थवा एक सिंगल मासा असल्यासारखा पोहत असतो. म्हणजे सुळकन उजवीकडे वळतो, सुळकन डावीकडे वळतो. आपल्याला हे सगळं नॉर्मल वाटते पण असा विचार करून बघा की त्यातला एक किंवा दोन मासे बंडखोर निघाले अणि त्यांनी थव्यापेक्षा वेगळं वागायचं, थवा जर उजवीकडे वळला तर मी डावीकडे वळणार असं ठरवलं तर? पण तसं होत नाही. तुम्ही स्थलांतर करणारे पक्षी पाहिलेत? त्यांचंही तसंच. ते तर अक्षरशः हजारो कि.मी. उडून येतात, पण तिथेच येतात. म्हणजे त्याच जलाशयावर परत येतात. त्यांचे GPS कसं काम करतं? तर थेअरी अशी आहे की हे मासे, हे पक्षी ह्या बाहेरच्या consciousness ला report करतात. 

हे एवढं पाल्हाळ लावायचं कारण म्हणजे हा अस्वस्थपणा. हा कुठून येतो याचा शोध घ्यायचा हा प्रयत्न. आपल्या बाहेरून येतो का? मग जातोही तसाच का? की उगीचच आपला मोठेपणा, शहाणपण दाखवायची ही एक नवीन idea आहे? 

तुम्हाला काय वाटतं? माझे हे लिखाण खूप random आहे. पण आपले विचार असेच random असतात ना? ‘व्यक्ति आणि वल्ली’ वाचलंच असेल ना? पुलंना नंदा प्रधान अचानक 20 वर्षांनी भेटला आणि काही सेकंदात पुलंच्या समोर 20 वर्षांपूर्वी झालेल्या अनेक घटना तरळून गेल्या. 

इंदू वेलणकर, तिचा तो खत्रूड बाप – ‘हाटेलात का? घर नाही का तुम्हाला?’  म्हणणारा, ते कॅम्पातल्या हॉटेलातले जेवण, राजपुत्रासारखा दिसणारा नंदा आणि राजकुमारीपेक्षा सुंदर दिसणारी ती इंदू  – समोर २० वर्षांनंतरचा नंदा उभा आहे आणि काही सेकंदात हे सगळे पुलंच्या मनात एखाद्या चित्रपट कथेसारखे सरकत गेले. 

पुलं म्हणतात, ‘मनाचा वेग किती भयंकर असतो.. असा अनुभव आपल्यालाही आला असेल. कालच मी बर्‍याच दिवसांनी नाशिकच्या रस्त्याने बराच प्रवास केला. अचानक मला नाशिकचे दिवस आणि तिथल्या अनेक आठवणी आल्या. मी गाडी चालवत नव्हतो, त्यामुळे घड्याळाकडेही लक्ष होतं. काही सेकंदात एवढ्या आठवणी येऊन गेल्या ज्या लिहायला मला कमीतकमी एक तास, आणि तुम्हाला वाचायला निदान दहा मिनिटे लागतील.  मग हे कसं झालं? 

‘मनाचा वेग किती भयंकर असतो..’ का हा मनाचा वेग नाहीच. हा आजूबाजूला पसरलेला consciousness आहे.  जाणीव आहे? आपले ऋषि सूक्ष्मरूपाने क्षणात हजारो मैलांवर  पोहोचत असे म्हणतात. तुम्हाला सांगतो ही कविकल्पना नाही. ज्या गोष्टींचा अर्थ विज्ञान सांगू शकत नाही त्याला आपण चमत्कार, अंधश्रद्धा असे म्हणतो. पण बऱ्याच वेळेस विज्ञानाला त्याचे कारण नंतर सापडते. वेगवेगळे शोध लागतात. जेम्स बॉण्ड च्या प्रत्येक पिक्चर मधली थक्क करणारी गॅजेट्स नंतर प्रत्यक्षात आली. Dan Brown ची Deception पॉईंट हि कादंबरी २००१ मध्ये पब्लिश झाली. त्यात किड्याच्या आकाराच्या microbot ड्रोन चा वापर आहे. पण पहिला commercial microbot ड्रोन म्हणे २०१९ मध्ये तयार झाला. एखादा माणूस समजा कोमातून आज अचानक जागा झाला, ५० वर्षांनंतर, तर त्याला मोबाईल, इंटरनेट, AI बघून धक्काच बसेल. 

हा विषय असा आहे की कितीही लिहिलं तरी संपणार नाही.  पण मला एक वाटतंय की मी अजून लिहायची गरज नाही…. तुमचे सगळ्यांचे विचार already या जगातले सगळे विचार करता करता थेट black hole पर्यंत पोहोचले आहेत. 

तर इथेच थांबतो, कारण माझा अस्वस्थपणा संपला.

14 responses to “अस्वस्थ”

  1. Dayanand Panse Avatar
    Dayanand Panse

    It is really thought provoking as well as it is very natural status of mind of most of us . One has to go through many challenges and experiences. So the restlessness occurs . Like the phrase half crisis !!’ 😊

    1. Hemant Jere Avatar

      Thanks Dayanand. It is heartening to know that my musings are finding resonance.नाहीतर मला वाटत होते, हे वाचण्यात कुणाला इंटरेस्ट असणार आहे

  2. Devdatta Damodar Pathak Avatar
    Devdatta Damodar Pathak

    अस्वस्थता कोंडून चिरडून नष्ट करावी असं एखादं साधन हवं,नेहमीच्या साधनांपेक्षा वेगळं मिळालं तर बर होईल,
    प्रत्येकाच्या अस्वस्थतेची कारणे वेगळी आहे ,पण मन चल बि चल , बेचैन होणार हे मात्र सत्य, पण हे संवेदनांचे फार मोठं सूचक चिन्ह आहे .
    संवेदनांची नकारात्मकता संपवता आली पाहिजे, म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी होणारी बेचैनी ही सुफळ संपन्न होईल,,
    हेमंतजी,, विचारांना चलित करणारा हा स्फूटलेख उत्तम

    1. Hemant Jere Avatar

      धन्यवाद पाठक सर. एकूण ४ वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. सर्व वाचून प्रतिक्रिया दिल्यास खूप छान वाटेल

  3. SANJAY MADHAV DESHPANDE Avatar
    SANJAY MADHAV DESHPANDE

    Heart touching! 💕
    किती सुंदर लिहिलं आहेस! अगदी मनातल्या भावनांना शब्दरूप दिलं आहेस. ❤️
    असंच सुंदर लिहित रहा आणि तुझ्या शब्दांतून मिळणारं हे शाब्दिक सुख सर्वांच्या हृदयात कायम साठून राहील.

    1. Hemant Jere Avatar

      धन्यवाद संजय . एकूण ४ वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. सर्व वाचून प्रतिक्रिया दिल्यास खूप छान वाटेल

  4. Sudhir Dinkar Vaidya Avatar
    Sudhir Dinkar Vaidya

    Nicely written Hemant. Keep it up.

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Sudhir. Would be happy if you could read all and give your honest feedback. I’m planning to post 1 blog every Sunday

  5. Chitra Shringarputale Avatar
    Chitra Shringarputale

    Wah! Khupach chhan… bara ahe thodya vela karata ch aswasth pana yeto nahi ka?

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Chitra!
      Yes this is a short phase.
      I think many would be experiencing this.
      Please read other blogs and give your feedback too.
      And also please tell other friends too.

  6. Swapna Joshi Avatar
    Swapna Joshi

    अस्वस्थता ही सृजनशीलतेला जन्म देते असं मी कुठेतरी वाचलेलं. तुमचा हा लेख त्याचं ऊत्तम प्रमाण आहे.

    1. Hemant Jere Avatar

      मला वाटतं, प्रत्येकालाच ही अस्वस्थता कधीतरी जाणवते. मी फक्त शब्दात मांडायचा प्रयत्न केला.

  7. Abhijit Wani Avatar
    Abhijit Wani

    खुप छान लिखाण. अस्वस्थता शब्दात मांडण्याचा छान प्रयत्न. अतिशय कॉमन पण महत्वाचा विषय. कॉमन अशासाठी कि आपण नेहमी म्हणतो / दाखवतो कि त्यात काय विशेष. It is a part of life. I am normal. आणि महत्वाचा अशासाठी कि बऱ्याच वेळा हा अस्वस्थ पणा आपल्या ला नकारात्मकते कडे घेऊन जातो.
    Many times we don’t deal with it, Rather we start live with it. तसे पाहिले तर आपण सर्व कधी ना कधी या अस्वस्थतेच्या अवस्थेतून जातो. कुणाची अवस्था ही अल्प काळ टिकणारी असते तर कुणाची दीर्घकाळ. पण मला वाटते कि ती बऱ्याच वेळा परिस्थिती सापेक्ष असते तर कधी व्यक्ती सापेक्ष. परिस्थिती सापेक्ष असेल तर ते व्यक्त होऊन किंवा अन्य मार्गाने सोडवता येऊ शकते परंतु व्यक्ती सापेक्ष असेल तर थोडे वेगळे प्रयत्न घेऊन करून तेही सोडवता येऊ शकते. पण ही अस्वस्थता बऱ्याच वेळा माणसाच्या आयुष्यावर परिणाम करते ते निश्चित.
    बाकी हा लेख बरेच काही सांगुन जातो. असच लिहीत रहा. खुप खुप शुभेच्छा

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Abhijeet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *