सुरवातीलाच सांगतो, मी संगीतज्ञ नाही, मी साहित्य समीक्षक नाही. मला गाणे, गायक, संगीतकार याचा प्रचंड इतिहास वगैरे माहित नाही. वाचलेली पुस्तके, टीव्ही, युट्युब, व्हाट्सअप या स्त्रोतांकडून झालेलं बहुमूल्य ज्ञान (यात मला खरंच sarcasm आणायचा नाही, पण तुमचा हट्टच असला तर तो तुमचा CHOICE) आणि वेगवेगळ्या लोकांशी मारलेल्या गप्पा हे माझं मुख्य भांडवल आहे. म्हणजे मी तुमच्यासारखाच आहे. पण उगाच कागदावर काहीतरी लिहायची वाईट सवय आहे, हा एक तुमच्यात कदाचित नसलेला दुर्गुण माझ्यात आहे. पु.ल म्हणतात तसं ‘कसली डोंबलाची प्रतिभा-साधना… आराम पडलो होतो ‘ हे आराम पडायचे सुख मला फारसं लाभलं नाही. कुणाला वारसा हक्काने जमीन, बंगले मिळतात, मला वारसा हक्काने कमी झोप मिळालीय म्हणून वेळ घालवायला असले रिकामे उद्योग करायची सवय लागलीय.
तर घडाभर तेल ओतून झालंय. आता नांदीकडे वळतो. असाच माझ्या डोक्यात विचार आला. इतकी असंख्य गाणी आपण ऐकली. हिंदी, मराठी चित्रपट संगीत, मराठी भावगीते, भक्तिगीते,नाट्यसंगीत, हिंदी (उर्दु ) गझल, कव्वाली, लावणी, पोवाडा, गवळणी, किती असंख्य प्रकार. अनेक गायक -गायिका, काही अतिप्रसिद्ध, काही प्रसिद्ध, काही फारसे माहित नसलेले, तर काही… फक्त नावं माहिती.. बाकी काही नाही.
आपल्याला कोणतं गाणं जाऊन आत भिडतं? मला माहितीये माझा प्रश्न फार ट्रिकी आहे. कुणी म्हणेल परफेक्ट सूर लागले की, तर कुणी त्यातल्या काव्याला महत्व देईल, कुणी चालीला, कुणी ठेक्याला. पण बरेचसे हुशार लोकं म्हणतील की, शब्द, संगीत आणि आवाज याच्या त्रिवेणी संगमाला. खरंही आहे ते. पण मला वाटतं की, परमेश्वर जसा संपूर्ण विश्व् व्यापून सुद्धा ‘दशांगुळे’ उरतो, तसं या त्रिवेणी संगमानंतरसुद्धा काहीतरी extra असतं.
एखादं गाणं पार आत जाऊन भिडतं. ते गाणं ऐकताना हुरहुर लागते. परत परत ऐकावसं वाटतं. एखादं भिडतं, एखादं नाही. म्हणजे एखाद्या गाण्याची हाइप इतकी झालेली असते की आपणही जणू कान पकडूनच ते गाणं ऐकतो. आणि वाटतं, ‘ठीक आहे, पण काही मजा नाही.’ अशी आहेत काही गाणी. उदा. ‘आज जानेकी जिद ना करो.’ किंवा ‘मेरे नैना सावनभादो’, किंवा ‘सखी मंद झाल्या तारका’. खूप फेमस आहेत. चांगली गाणी आहेत. पण… मनाला भिडत नाहीत. ‘मेरे नैना ‘ म्हणणारा तोच किशोर जेव्हा ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन..’ म्हणतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं. तसं पाहिलं तर दोन्ही गाण्याचा अर्थ तोच आहे..
हे भिडणं वेगवेगळ्या गायिका – गायकांच्या, संगीतकारांच्या बाबतीत होतं. खूप उदाहरणं आहेत. पण आजचा विषय आहे, पं. वसंतराव देशपांडे आणि गाणं.. राहिले. ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे’.. कवी वा. रा. कांत आणि संगीतकार अर्थातच खळेकाका.
या गाण्याची एक आठवण. २००९ साली नाशिकहून पुण्याला येत होतो, एकटाच. गाडीत तेव्हा cd player होता. एक नवीन CD टाकली होती. त्यावर हे गाणं लागलं होतं. तसं या आधी मी खूप वेळा ऐकलं होतं. पण त्यादिवशी काय भानामती झाली माहित नाही. हे गाणं मी rewind केलं. पुन्हा ऐकलं. पुढचं गाणं लागतंय तर परत राहवलं नाही. पुन्हा rewind केलं. पुन्हा ऐकलं. परत तिसऱ्यांदा केलं. आणि असं मोजून 10 वेळेस केलं. किती वेळ गेला याकडे लक्षच नव्हतं, रस्ता कटत होता, ट्रॅफिक किती होतं, मी किती स्पीडनी चाललो होतो, काही आठवत नाही. दहा वेळा ऐकल्यावर जरा थकल्यासारखं वाटलं. मग मी CD, रेडिओ सगळं बंद करून शांतपणे पुण्याकडे जात राहिलो.
असं काय आहे या गाण्यात? गुगल सर्च केल्यास कळेल की हे कलावती रागातलं आहे. इतर सगळी माहिती पण मिळेल. पण जर तुम्ही माझ्यासारखं एकट्यानेच कोणताही disturbance – चित्त विचलित करणारी कोणतीही गोष्ट घडत नसताना ऐका. मग ते गाडीत ऐका, घरात ऐका, डायरेक्ट ऐका किंवा हेडफोन लावून – काही फरक पडत नाही. हे जाणीवपूर्वक ऐकल्यावर तुम्हाला काहीतरी जाणवेल.
या गाण्यात एक breathless चा अनुभव आहे. तुम्ही हे गाणं म्हणायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे गाणे म्हणायला किती अवघड आहे. आणि याचा तालही ऑफबीट आहे.पं. वसंतराव हे तालाचे मास्टर होते. काही तालावर प्रभुत्व असलेल्या गायकांचं किंवा वादकांचं संगीत ऐकताना ते तालाशी खेळतायत असं वाटतं. पं वसंतरावांची बरीच गाणी ऐकताना त्याही पुढचं म्हणजे ते आवाजातून अक्षरशः नृत्य करताहेत असं वाटतं आणि ताल हा त्या कंठन्यासाला साथ देत असतो.
आणि ‘राहिले’मध्ये याहीपुढे एक कडी आहे. लहानपणी मी एक सुभाषित वाचल्याचं आठवतं. त्याचा अर्थ असा काहीतरी होता की सामान्य माणसं मनात अर्थाचा विचार करून शब्दांची जुळवणी करतात. पण खरे ज्ञानी बोलतात तेव्हा अर्थ शब्दांच्या मागे धावतो. तसं वसंतराव त्यांच्याच नादात गात जातात. आणि ताल त्यांच्या मागं धावतोय असं या गाण्यात वाटतं.
आता थोडं काव्याविषयी आणि चालीविषयी. हे विरहगीत आहे हे नक्की आहे, पण नुसता विरह नाही, तर वियोग आहे. तो इतका पूर्ण आहे की, ‘आपली भेट खरंच झाली होती की स्वप्न, हा प्रश्न त्याला पडलाय. फ्रेम बाय फ्रेम, फ्लॅशबॅक दिसावेत तसं त्याला ते कापरे हात आठवतात, पाचूसारख्या पाण्यापाशी खेळणारी ती सारसांची जोडी आठवते. (बहुधा कवी आणि त्याची सखी हीच ती जोडी ). वाल्मिकी ऋषींना जगातलं पहिलं काव्य असंच सारस (क्रौंच ) पक्षाच्या जोडीतल्या एकावर पारध्यानी बाण चालवल्यावर स्फुरलं होतं. हा त्या अजरामर काव्यपंक्तीचा उत्तरार्ध तर नव्हे? म्हणजे कल्पना करा की त्या सारस पक्षाची सखी शिकाऱ्याच्या बाणाला बळी पडली. नंतर तो सारस एकटाच त्याच्या सायबेरियातील निवासात परत गेला आणि नंतर कधीतरी इथेच परत आला आणि त्याला या पंक्ती सुचल्या.
…..आणि या वियोगाला सीमा नाही, अंत नाही. बेलदारच्या सायलीने कितीही फुले देऊ देत, माझे पात्र भरून येणार नाहीये. आज फक्त्त ती आठवण आहे. Acknowledgment आहे. या काव्यात वियोग आहे, दुःख आहे, पण त्याचा एक mature acceptance सुद्धा आहे.
गुलजारच्या पंक्ती जर उलट्या केल्या तर या काव्याचा अर्थ लागेल.
तेरे बिना जिंदगी, जिंदगी तो नही.
फिर भी, तेरे बिना जिंदगी से, कोई शिकवा नही.
खळेकाकांच्या संगीताविषयी आजकाल कुणीही बोलतो, म्हणून मीही बोलतो. आपण सगळे खळेकाकांच्या संगीताचे फॅन असतो. कांदेपोहे हा इतका स्टॅंडर्ड पदार्थ आहे. त्याचे घटक ठरलेले आहेत, रेसिपी ठरलेली आहे. तरी एखादीचे कांदेपोहे divine होतात. यात काय वेगळं आहे कळत नाही, पण लागतात भारी, तसंच.
खळेकाकांच्या फक्त्त 2 चाली ऐका. ‘सुंदर ते ध्यान’ हा वारकरी संप्रदायतला सर्वात कॉमन अभंग आहे. ती चाल ऐका आणि काकांची. नुसतं ‘सुंदर…’ ऐकलं तरी मेंदू थांबतो, आणि ‘तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख’ म्हणलं की ते सुख डोळ्यासमोर उभं राहतं. तसंच कमलाकर भागवातांनी ‘जेथे जातो तेथे..’ हा अभंग केला आहे. छान चाल आहे. पण ते म्हणजे एक साधं छान भक्तीगीत वाटतं. खळेकाकांचं जेथे जातो तेथे…. ऐकलं की तो सांगाती दिसायला लागतो.
राहिले… मध्ये विशेष अशी कोणतीच जागा नाहीये. संपूर्ण गाण्याला एकच चाल आहे. कारण त्या कवीच्या मेमरीतली ही एकच फेज आहे. फक्त ‘ही खरी की’, नंतर घेतलेला एक पॅाज आहे. कारण कवीला तो अभिप्रेत आहे. खळेकाका म्हणत की शब्दच त्यांची चाल घेऊन येतात. खळेकाका कधी चाली तयार ठेवत नसत. पंजाबी डिश सारख्या म्हणजे दोन ग्रेव्ही तयार ठेवायच्या. एक लाल, एक हिरवी. गिर्हाईक मागेल ती भाजी त्यात घातली की तयार. खळेकाका मात्र काव्य मिळाल्यावरच चाली लावायचे. तर या शब्दांनी त्यांच्या मनात ही चाल घेतली. आणि हे दशांगुळे उरणारं गाणं तयार झालं.
अजून किती लिहू. हे वाचल्यावर एक करा. निदान एकदा हेडफोन लावून. ‘राहिले ओठातल्या ओठात…’ ऐका.. नंतर स्वतःलाच सांगा…
हेमंत जेरे
२५.१०.२०२६
Leave a Reply