अर्धवट

रोज काही मी पूजा करत नाही. पण गुरुवारी -रविवारी वगैरे करतो. आज पूजेला बसल्यानंतर लक्षात आलं की एक ताम्हण धुवायचे राहिले. परत उठलो आणि धुवून आणलं. नंतर लक्षात आलं की काडेपेटी संपलीय. पुन्हा उठलो, स्वयंपाकघरामधून नवीन काडेपेटी घेऊन आलो. खरंतर मला पूजेची घाई असते. म्हणलं तर सगळ्याची घाई असते. त्यात अशा काही गोष्टी सटकतात (मेंदूच्या गफलतींवर किंवा खरंतर चुकांवर पांघरूण घालणाऱ्या ‘slipped from my mind,’ या चतुर वाक्प्रचाराचे हे मी भाषांतर केलंय. बाकी इंग्लिश माणूस फारस बेरकी. सरळ कबूल करायचं की ‘मी विसरलो कारण नंतर ब्रेकफास्टला काय  काय असेल याचा विचार मी करत करत होतो….पण नाही.  अर्थात इंग्लिश लोकांवर माझा राग मुघलांवरच्या  रागापेक्षा जास्त आहे. लय लुटला आपल्याला. हे विषयांतर होतं म्हणून मुद्दाम कंसात टाकलं ). अर्थात घाई करून फायदा होत नाही. अशा गोष्टी विसरल्यावर वेळ अजूनच जास्त जातो. अर्धवट काम – दुसरं काय. 

लहानपणापासून ऐकत आलोय. मनातून पटलेलं पण आहे की काम शांतपणे करावे, प्रत्येक बारकाव्याचा विचार करून करावे. परफेक्शन गाठण्याचा प्रयत्न करावा. एकावेळेला एकंच काम करावे. ‘एक ना धड भराभर चिंध्या किंवा ‘क्षेत्रातला न्हावी सर्वांची अर्धी दाढी करतो.  किंवा Practice makes  a man perfect वगैरे वगैरे. 

‘पण तुझं सगळं काम अर्धवट असतं.’ असं जेव्हा प्राजक्ता म्हणते तेव्हा ते खरं असतं. मी विचार केला, आपण अर्धवट काम का करतो? अर्थात यात एक बारीकसा फरक आहे. अर्ध काम म्हणजे 50% किंवा जवळपास अर्धवट काम कदाचित 99% सुद्धा असू शकतं (‘काहीही ह….’ ही फ्रेज काही वर्षांपूर्वी लोकप्रिय होती, आता गायब  झालीय.) अर्धवट कामाची डेफिनेशन म्हणजे पूर्ण नसणे. पूर्वीच्या मॅचेसमध्ये सेंचुरी, डबल सेंचुरी पूर्ण होणे, याला  फार महत्व होते. मॅच ड्रॉ झाली तरी चालेल. मग द्रविडने सचिन १९५ वर असताना इंनिंग डिक्लेर केली, म्हणून सचिन रुसला होता. 

मी अर्धवट कामाचं जस्टिफिकेशन करत नाहीये किंवा परफेक्शनला नावं ठेवत नाहीये, हे असं का होतं याचा विचार करतोय, त्याचं मूळ ते शोधून काढायचा प्रयत्न करतोय. कदाचित किंवा बहुतेक हा माझ्या भारतीय असण्याचाच एक परिणाम असेल. मला माहित असलेली अनेक माणसं माझ्यासारखीच आहेत. टक्केवारीत फरक असेल. चांगली माणसं आहेत, पुरुष -स्त्रिया दोघेही. आणि उगीच पूर्वी असं नव्हतं वगैरे फुशारक्या  मारण्यात काही अर्थ नाही. आपले आजी – आजोबाही असेच होते. कदाचित आपली नातवंडे  ही अशीच होतील, अनलेस… 

ते अनलेस जरा बाजूला ठेवूया…  आजकाल एक नवीन स्टडी आलाय., पुरुषांनी आठवड्यातून एकदा तरी स्वयंपाक स्वतः केला तर dementia न व्हायला मदत होते. असं तो स्टडी सांगतो. मला पण अधून मधून किचनमध्ये लुडबुड करायला आवडते. माझ्या मते माझी कुठलीही पाककृती ही एखाद्या कलाकृतीप्रमाणे असल्यामुळे चमच्याने मोजून किंवा वजन करून त्यातले ingredients (घटक पदार्थ हा अगदीच सरकारी शब्द वाटल्यामुळे आणि दुसरा न सुचल्यामुळे हा सोपा चांगला पर्याय वापरला). टाकत नाही. तरी मी केलेला पदार्थ चांगला होतो, असा मला वाटतं, पण ingredients न मोजता अंदाजपंचे टाकणे हा काही अर्धवटपणा नाही, वह तो अपना स्टाईल है, आर्टिस्ट जो हूँ! 

अर्धवटपणा कुठला, तर स्वयंपाक करून झाल्यावर गॅस, शेगडी, ओटा, बाहेर काढलेले वेगवेगळे डबे, बाटल्या, हे परत आवरून न ठेवणं. बायकोचा असा नेहमीचा आक्षेप  आहे की ‘तू सगळी कामं अर्धवट करतोस.’ 

तर काम अर्धवट ठेवणं ही आपली मक्तेदारी आहे का? आपली म्हणजे भारतीयांची. जर ऐतिहासिक गोष्टींचा मागोवा घेतला तर खूप प्रमाणात हे खरं सुद्धा आहे. म्हणजे सीमाप्रश्न 90% सोडवायचे आणि थोडे तसेच सोडून द्यायचे. 

आपल्याकडे प्रश्न निर्माण होण्याचं प्रमाणही खूप आहे. उदा. पारतंत्र्यात आमरण उपोषण हे योग्य शस्त्र होते. पण आता माणूस आमरण उपोषणाला बसला (हे एक प्रकारचं इमोशनल आणि पोलिटिकल ब्लॅकमेल असतं) की काहीतरी आश्वासने देऊन सरकार त्या व्यक्तीला उपोषण सोडायला लावतं. आता यामुळे दुसरी पार्टी नाराज होते. मग आश्वासनापैकी काही पूर्ण करायची आणि समस्या आपोआप सुटतील असा आशावाद करायचा. एकूण काय काम अर्धवट सोडायचं. 

Quantum Physics चं मूळ तत्व आहे की एखाद्या  कणाचा वेग आणि त्याची अचूक जागा आपल्याला एकाचवेळेस कळू शकत नाही. यालाच Heisenberg  Uncertainity Principle असे म्हणतात. गैरसमज नको. मला त्यातलं काही कळत नाही. पण हे कळते की भौतिकशास्त्रासारख्या अचूक शास्त्रात सुद्धा हा अर्धवटपणा आहे. (इथे मी अर्धवटपणा हा शब्द सर्वांची क्षमा मागून केवळ लेखाचं नाव परत परत यावं म्हणून वापरतोय ). त्यात म्हणे तुम्ही पार्टिकलकडे पाहिलं तर तो वेव्ह  होतो, पाहिलं नाही तर पार्टिकल राहतो. आता याला उपमा तुम्हीच द्या. 

पण मला असं वाटतं की हा अर्धवटपणा आपल्या DNA मध्ये आहे. आपण चांगले flyovers बांधतो, पण रोडवर खड्डे सोडतो. गोड दिसणाऱ्या बाळाच्या गालावर एक ठिपका लावतो – तीट. एखादा अति सज्जन माणूस भेटला तर जोपर्यंत त्याचा कमीतकमी एखादा दुर्गुण सापडल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. मग कितीही फालतू का असेना. ‘दारू पीत नाही?’ ‘सिगारेट सुद्धा ओढत नाही?’ ‘अहो दिवसरात्र त्या सोशल मीडियावरच असतो. कधी x,  कधी इन्स्टा, कधी फेसबुक.’ असं सतत सोशल मीडियावर असणं, म्हणजे दारूपेक्षा वाईट, माणूसघाणा होतो स्वभाव.  एकूण काय माणूस अर्धवट आहे हे कळलं – आपल्याला हायसं वाटते. 

स्वप्नांतल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा 

गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा. 

हा लेख अर्धवट लिहून सोडून द्यायची माझी इच्छा होती. पण पूर्ण म्हणजे तरी काय? मध्यंतरी ‘सूचक शेवट असलेल्या पिक्चर्स आणि नाटकांची लाट आली होती. सूचक कसलं – अर्धवट.  म्हणजे हिरोईन दोन हिरोच्या प्रेमात – शेवटी कोणाला हॊ म्हणायचं या final decision च्या आधीच The end. या प्रकाराला artistic म्हणायचे. पण हे फार चाललं नाही. आपला dna अर्धवट असला तरी काही गोष्टी आपल्याला पूर्ण लागतात. म्हणजे स्वयंपाक केल्यावर आवरताना आपण कंटाळा करू पण जेवण मात्र पूर्ण लागतं. म्हणजे सूप पासून dessert पर्यंत. किंवा पूर्वीच्या पद्धतीत पहिल्या भातापासून ताकभात येईपर्यंत.  शिवाय शेवटी पान वगैरे आणि रविवार असला तर – नंतर झोप. 

तर गणेशचतुर्थी असल्याने मोदकाचे छान जेवण झाले आहे. आजकाल जेवण फार जात नाही असे म्हणत खूप मोदक खाल्लेत. पानही झालय. झोपायची वेळ झाली आहे.

राम राम.

21 responses to “अर्धवट”

  1. milind chhatre Avatar
    milind chhatre

    जेरे
    फार छान लिहिले आहेस
    असेच पुढील लिखाण पाठवत जा
    नक्की वाचूनअभिप्राय देईन

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद . नक्की पुढेही हे ब्लॉग्स वाचत राहशील अशी खात्री आहे. तुझ्या इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  2. संजय गोडबोले Avatar
    संजय गोडबोले

    हेमंत खूप छान लिहिलयस. असाच लिहीत रहा. वाचकांना आनंद दे

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद संजय . नक्की पुढेही हे ब्लॉग्स वाचत राहशील अशी खात्री आहे. तुझ्या इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  3. Nitin Deshpande Avatar
    Nitin Deshpande

    जुन्या आणि नवीन जमण्याचं एक छान वास्तव प्रस्तुत केलं आहे
    हेमंत खुप छान 👍👍👌👌

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद नितीन. नक्की पुढेही हे ब्लॉग्स वाचत राहशील अशी खात्री आहे. तुझ्या इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  4. गोविंद बहिरट Avatar
    गोविंद बहिरट

    प्रिय हेमंता,
    अरे,
    मला महिती नव्हते की, तू इतके सुंदर लिहितोस.
    अर्धवट माहिती पण पूर्ण लिहिलीस, मस्त वाटलं.
    असेच लिहित रहा.
    मी पण नको नको म्हणत मोदक हाणलेत (हा पण एक अर्धवट शब्द).
    असो…..
    आता तुझ्या पुढच्या लेखाने कदाचित जाग आली तर पाहू.
    लेखन सिमा….

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      गोविंदा सहज जे वाटतंय ते लिहीत जातो इतकंच. पुढेही असेच अभिप्राय पाठवत रहा.

  5. Vrushali Anil Godbole Avatar
    Vrushali Anil Godbole

    मस्त

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद वृषाली

  6. Dhananjay Chiplunkar Avatar
    Dhananjay Chiplunkar

    हेमंत सहज आणि सोप्या भाषेत छान लिखाण केलयस. नाव अर्धवट दिलं असलं तरी ब्लॉग पूर्ण लिहीलायस, छान 👌
    धनंजय चिपळूणकर

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद धनु .

  7. नितीन बोराटे Avatar
    नितीन बोराटे

    नाव जरी “अर्धवट “असले तरीही परिपूर्ण .
    अजून काही लिहायचे होते पण मी झोपेत “अर्धवट” वाचले.

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद नितीन. नक्की पुढेही हे ब्लॉग्स वाचत राहशील अशी खात्री आहे. तुझ्या इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  8. Ajit Sathe Avatar
    Ajit Sathe

    जे लिहिलेस ते उत्तम आणि सहज साधा सोपा विषय जसा चा तसा मांडला आहेस. विषय मांडला आहेस, ते मन कसा वेगळे कंगोरे घेत ते फार भावले. वाचून मजा आली कारण ते माझ्यातील एक आहे हे तुझ्या लिखाणाने जाणवले. अर्धवट म्हणजे 50% की 99% हे भारी वाटले.

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद अजित . तुझ्या इतर कंमेंट्सची पण वाट पाहीन. इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  9. संजीवन जोशी Avatar
    संजीवन जोशी

    खूपच छान लिहले आहेस.खुप खुप शुभेच्छा.

  10. संजीवन जोशी Avatar
    संजीवन जोशी

    खूपच छान लिहले आहेस.खुप खुप शुभेच्छा.

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद संजीवन. तुझ्या इतर कंमेंट्सची पण वाट पाहीन. इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  11. Makarand Joshi Avatar
    Makarand Joshi

    तिन्ही ब्लॉग वाचले फारच छान वाटले, काही गोष्टी एकदम पटल्या.

    फक्त ब्लॉग खुप मोठा वाटला, बाकी चालू ठेव ब्लॉग लेखन

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद मकरंद. तुझा फीडबॅक आवडला. तुझ्या इतर कंमेंट्सची पण वाट पाहीन. इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *