माझ्या एका मावशीचे सासरे मी शाळेत सातवी आठवीत असतानाच बरेच वयस्कर होते. पण तरीही ते अत्यंत active होते. भरपूर चालायचे वगैरे. मावशीला ५ मुले – ४ मुले, एक मुलगी. त्या मुलांचे काय, किंवा माझे काय, आई, मावशी भरपूर लाड पुरवतायत म्हटल्यावर खाण्यापिण्यात फार नखरे असायचे. ‘हे मला आवडत नाही,’ ‘बटाटा वातुळ, मी खाणार नाही.’ ‘आज माझी खायची इच्छाच नाहीए’, ‘किती भाजी वाढलीये,’ वगैरे वगैरे…….
मला आठवतंय, हे आजोबा नेहमी सांगायचे, ‘पोरांनो, खाऊन माजा रे, टाकून माजू नका.’ ते खूप प्रेमळ होते, त्यामुळे त्यांचा धाक वाटायचा नाही. उलट आम्ही त्यांच्याशी वाद घालायचो. ‘आजोबा, किती खाणार?’ ‘आजोबा, सगळ्यांना माहितीए, मला दोडक्याची भाजी आवडत नाही, तरी आई मुद्दाम करते, पण मी नाही खाणार.’
आजोबा परत म्हणत, ‘खाऊन माजा रे, पोरांनो, टाकून माजू नका.’ आम्हाला त्या बोलण्यामागचा अनुभव, त्यातली कळकळ जाणवायची नाही. मी जरा अतिशहाणा, आर्ग्युमेंट करण्यात, आईच्या शब्दात ’वितंडवाद’ घालण्यात पटाईत. मी म्हणायचो, ‘आजोबा खाऊन किंवा टाकून, माजायचंच कशाला?’ आणि भाजी आणणाऱ्यांनी, कुठली भाजी खाल्ली जाईल हा विचार करूनच आणायची ना. उगीच दोडका, पडवळ अशी भाजी आणली तर कोण खाणार? …. अर्थात ही शेवटची २ वाक्ये मनात म्हणायचो. पण आज इतक्या वर्षांनंतर कळतंय – ‘माजायचंच कशाला’ हे बोलणारा मीच माजलेला होतो. भाजी आणायचे निर्णय त्या काळात कुणाला काय आवडतंय या पेक्षा आज बाजारात ताजी आणि स्वस्त भाजी कोणती आहे यावर व्हायचा. तरीही त्यातल्या त्यात कालच केलेली भाजी पुन्हा आज नको असाही विचार असे. त्याकाळात घरोघरी फ्रिज नसल्याने कांदा आणि बटाटा सोडला तर इतर भाज्यांना रोजच्या रोज आणणे याला पर्याय नव्हता.
आज जेवण करताना मला या सर्व गोष्टी आठवल्या आणि डोळ्यात पाणी आलं. किती मस्तवाल होतो आपण, किती दुखावणारे बोललो होतो या निखालस प्रेमळ आजोबांना. त्यांचा सख्खा नातू असतो तर कदाचित कानाखाली जाळ निघाला असता, पण नसता निघाला कारण त्यांची नातवंडे उघडपणे बोलत नसली तरी त्यांना न आवडणारे पदार्थ शिताफीने टाळायची.
‘खाऊन माजा रे’ ……..एक विचार सहज मनात आला. नतद्रष्टपणाचे खरं लक्षण काय आहे? लहानपणी आईबरोबर कधी कुठल्या सुखवस्तू घरात गेलेलो असताना तिथल्या स्त्रियांच्या तब्येतीविषयी तक्रारी ऐकायचो. मला फारसं काही लक्षात नसायचं , पण कधी आईला विचारले ‘आई, त्या मावशीला नक्की काय होतंय ग?’, ती म्हणायची ‘सुख दुखतंय’. तेंव्हा अर्थ कळला नाही, पण वाक्य लक्षात राहिलं.
आज आपण आजूबाजूला असे अनेक पुरुष,अनेक स्त्रिया पाहतो. प्रत्येकाची आरोग्याचीच काही तक्रार असेल असे नाही. कधी ट्रॅफिकबद्दल तक्रार, कधी बॉस, कधी हॉस्पिटल, कधी कोणी नातेवाईक, कधी भाजीवाला, कधी कामवाली, कधी वॉचमन, कधी ड्राइवर, कधी कोण- कधी कोण. यात तक्रारीकरता सगळ्यात सोपं टार्गेट म्हणजे राजकारणी लोक. कोणी किती भ्रष्टाचार केला आणि कसा श्रीमंत झाला, याविषयी तक्रार.
‘आक्रोश’ सिनेमात अमरीश पुरी हा नासिरुद्दिनचा गुरु म्हणता येईल असा वकील असतो. फ्रस्ट्रेट झालेल्या नासिरुद्दिनला तो सांगतो ‘तुम उसका कारण ढुंढोगे, फिर ऊस कारण का भी कारण होगा, फिर ऊस कारण के कारण का भी कारण होगा. फिर तुम्हे लगेगा कि पूरा समाज अंदर से सडा हुआ है।’
या लोकांना असा समाज सगळा सडलेला आहे, सगळी माणसे भ्रष्ट्राचारी, व्यभिचारी, अन्यायी आहेत असं वाटतं. मग हा देशच वाईट आहे, असं त्यांना वाटायला लागतं. ‘इथं सगळी वाट लागलीय, तुम्ही तिकडे बघा.’ तिकडे म्हणजे कुठे? तर युरोप, अमेरिकेकडे. ‘रंग दे बसंती मधलं ते सिद्धार्थचं कॅरेक्टर आठवतंय का?…. ‘इस कंट्री का कुछ नाही होगा’ म्हणणारं .
तसं म्हटलं तर यांचं लौकिकार्थानं अतिशय उत्तम चाललेलं असतं. चांगल्या लोकेशनला, चांगला फ्लॅट किंवा बंगला, चांगलं उत्पन्न, सर्व कुटुंब सुस्थितीत, मुलं बहुतेक तिकडे…… तरीसुद्धा हे कायम वैतागलेले…. सुख दुखणारी माणसं.
माझा असा कुठे दावा नाही कि भारतात, पुण्यात, सगळं काही आलबेल आहे. तसं नाहीए, अनेक समस्या आहेत. अजूनही अनेक लोकांवर अन्याय होतोय. कुठं पर्यावरणाचा नाश होतोय. पण जर तुम्हाला खरंच त्या पीडितांबद्दल खूप आस्था असेल तर तुम्ही तुमच्या आरामशीर सोफ्यावरून उठा आणि काहीतरी करा. त्या पीडितांना मदत करा. अन्यायाविरुद्ध उभे रहा. तुमचा अनुभव दांडगा आहे, तुम्हाला समस्येचे मूळ शोधून उपाय करण्याचे महत्व माहितेय, तर ते करायचा प्रयत्न करा. नुसते सोशल मीडियावीर होऊ नका. बाहेरचं जाऊ दे, अगदी ‘मला काहीतरी होतंय’ ही भावना असेल तर तुम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न करा. त्यावर उपाय शोधा. मी चॅट जिपीटी डॉक्टर व्हायला सांगत नाहीये, तर योग्य action घ्यायला सांगतोय. पण टाकून माजणाऱ्या लोकांना यातलं काहीच करायचं नसतं. त्यांना फक्त तक्रार करायची असते.
आज आपल्याकडे जी सुबत्ता आहे ती आपल्या हयातीत पूर्वी कधी नव्हती. आणि माझी खात्री आहे कि काहीतरी भयंकर घडलं नाही, (म्हणजे तिसरं महायुद्ध किंवा काही भयंकर नैसर्गिक आपत्ती) तर ही सुबत्ता वाढत राहील. मला आठवतंय, १९७२ च्या दुष्काळानंतर, सरकारने ‘मिलो’ नावाचं एक लाल धान्य (जे अमेरिकेत डुकराचं खाद्य होतं) आयात केलं होतं, आणि रेशनवर तेच मिळायचं. माझी आई, त्याच्या भाकऱ्या, कधी experimentation करून त्याचं थालीपीठ करायची. ‘खाना है, तो यहीं खाना है, नहीं खाना है, तो भी यहीं खाना है|’ अशी परिस्थिती असल्याने सर्वच जण मुकाट्याने ते खायचे. प्रह्लाद शिंदेच्या ‘बाप्पा मोरया रे’ गाण्यात ‘नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे’ हि जी ओळ आहे त्यातला लाल गहू म्हणजे हा मिलो. कारण त्या वर्षी बाप्पाकरता सुद्धा तांदूळ मिळत नव्हता, त्यामुळे त्यामुळे ‘नाव काढू नको’ असे बाप्पालाच बजावण्यात आले.
आज तोच माणूस, ब्रेकफास्टला प्रोटीन ब्रेड, दुपारच्या जेवणात गव्हाचा फुलका आणि रात्री डिनरला चांगल्या ज्वारीची छान पातळ भाकरी खातो. बरोबर कधी अमंड मिल्क असतं, कधी कॉटेज चीज असतं आणि कधी you know ….. कधी फक्त पालेभाजी आणि ताक. पण यातलं आम्ही कधीही नीट काही खात नाही, कारण खाताना, जेवताना चर्चा हीच, ‘या देशाचं काही खरं नाही.’
साहिरने ‘चित्रलेखा’त फार छान गाणे लिहिलंय.. ‘संसारसे भागे फिरते हो…’ त्यातल्या शेवटच्या कडव्यात थोडा बदल केला तर असं काहीसं होईल.
हम कहते हैं, भारत अपना हैं, तुम कहते हो गंदा सपना हैं !
परदेसमें भी हम देसी हैं, तुम देसमें भी परदेसी हो !
चांगलं मनापासून केलेलं काम, सुंदर लिखाण, मनाला भिडणारी कविता, एखादं छान नाटक, संगीत, सिनेमा, नवी कार किंवा बाईक, समुद्रकिनारा, पर्वत, एखादं मंदिर, पंढरीची वारी, नुसताच प्रवास, मित्रांबरोबर पार्टी, एखादी शाळा, एखादे पॉडकास्ट, कुणाचं नुसतंच स्मित, एखाद्या झाडाची सावली, एखाद्या स्त्रीचं किंवा पुरुषाचं सौन्दर्य, बाळाचे हास्य, मांजराचे डोळे मिचकावणं, कुत्र्याचं अंगावर उड्या मारणं. सुंदर गोष्टींची ही यादी संपणारच नाही. ‘देणाऱ्याचे हात हजारो’. आज आपल्याला खाऊन माजण्याकरता इतक्या गोष्टी आहेत. राहवत नाही म्हणून अजून यादी थोडी वाढवतो. आपल्या घराची सुंदर सजावट, तासभर व्यायाम केल्यावर येणार सुखद थकवा (माझा एक बॉस याला मीठा पेन असं म्हणायचा), थंडीत कुडकुडत असताना मिळालेला वाफाळ चहा, पांडुरंगाचं दर्शन, धुरंधरचा अनुभव आणि बुवांचं ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’.
इतके सुंदर सगळं असताना कसली तक्रार? आणि इतकी तक्रार? बरे या तक्रारखोराना हि कल्पनाच नाहीये कि आपण तक्रारखोर आहोत, आपल्याला सुख दुखतंय. त्यांना वाटतंय आपण बरोबरच आहोत. कोण जाणे मी हे लिहितोय, कदाचित मीही तसलाच असेन. लहानपणी पाहिलेल्या ‘सुख दुखणाऱ्या’ मावश्या या आमच्यापेक्षा वेगळ्या दर्जाच्या होत्या. आज मात्र मी ही, आणि माझ्यासारखेच इतर अनेक या कॅटेगरीत येऊन पोहोचलेत कि काय असं मला वाटायला लागलंय.
सन्यस्त जीवनाविषयी कितीही आदर असला तरी ते मला शक्य नाही याची जाणीव आहे. म्हणूनच माझं देवाकडे एवढंच मागणं आहे. Let me be positive throughout. ‘टाकून माजणारा’ होऊ देऊ नकोस देवा.
Leave a Reply