तुम्हाला तो ‘हेराफेरी’-मधला जॉनी लिव्हर आठवतोय, बोलता बोलता मध्येच विसरणारा? “भूला…..” आपण जॉनी लिव्हरचे अतिरंजित हावभाव, त्याचं डोळे फिरवणं एन्जॉय करतो. कारण ते अत्यंत खोटं, over the top म्हणतात तशाच स्वरूपाच्या पिक्चरमधलं पूर्णपणे ILLOGICAL दृष्य असतं, म्हणजे तो लॉजिकल करायचा प्रयत्न केला असता तर फसलं असतं, मग ते एखाद्या प्रचंड विनोदी नाटकासारखं हास्यास्पद झालं असतं. हे खरं आहे, पण मला सांगा ‘विसरणं’ हे खरंच एवढं खोटं, एवढं न पटणारं असतं का?
माणसं काय काय विसरतात? पूर्वी लोकं छत्री विसरायचे किंवा चष्मा किंवा चपला. लहानपणी मी कंपास पेट्या, पेन्सिल, खोडरबर हमखास हरवायचो. चष्मा नव्हताच म्हणून तो वाचला. पण सांगितलेलं काम, गृहपाठ, कधी न खाताच डबा (टिफिन) असं काही बाही विसरायचो. तरुण वयात दुकानात आलेल्या एखाद्या चेहऱ्याने नुसते स्माईल केले तर त्या धुंदीत उरलेले पैसे परत घ्यायला विसरायचो. कर्नाटकात जरा जास्तच इरसाल म्हणता येईल अशी एक गोष्ट आहे. ‘अचानक जावई घरी येतो, तेव्हा सासू अंघोळ करत असते. जावई आल्याचं कळताच अत्यानंदाने नीट कपडे घालायचेच विसरते. कावराबावरा झालेला जावई सारखं तिला ‘सासूबाई, झाका……. झाका’ सांगत राहतो. पण अत्यानंदाने सर्व भान विसरलेली सासू उगीच हे पातेलं झाक, तो डबा झाक असंच करत राहते. शेवटी तिची मुलगी येऊन तिला भानावर आणते वगैरे वगैरे. ‘युरेका’ वाल्या (vaccum cleaner नाही तर खरं original युरेका) आर्किमिडीजची गोष्ट तर अख्ख्या जगाला माहितीय.
आजकाल लोकं अपॉइंटमेंट विसरतात. घेतलेले पैसे विसरतात. चष्मा आणि घड्याळ विसरायची फॅशनसुद्धा अजून गेलेली नाही. काही जणं तर बायका विसरतात (स्वतःच्या). म्हणजे फॅमिली पार्टी असली की हे लोकं पुरुषांच्या गोतावळ्यात इतके हरवतात की आपण बायकोला इथे घेऊन आलो आहोत हेच विसरतात. बायकांनी नवऱ्यांना विसरण्याचा किस्सा मात्र मी कधी ऐकला नाही.
काही लोक नेमाने अधून मधून रिक्षात दागिने-पैसे विसरतात, स्पीड लिमिट विसरतात, क्रेडिट कार्डचं पेमेंट विसरतात, पुरुष लोकं जुने मित्र विसरतात (मैत्रिणी मात्र नाही). बऱ्याच वेळेस या विसरण्याचा खूप त्रास होतो. कधी कधी महत्त्वाची कामे चुकतात. एकदा नागपूरला कामात मी इतका गुंतून गेलो की फ़्लाईटची वेळ विसरलो. फ्लाईट चुकली आणि नंतर १५-१६ तासाचा प्रवास करत बसने पुण्याला यावे लागले. एकदा रात्री ‘फाऊंटनहेड’ वाचता वाचता झोपायलाच विसरलो. थेट सकाळी अंघोळ करून ऑफिसला गेलो.
कधी मौल्यवान वस्तू हरवते. माझ्या एका सुनेने आतापर्यंत १२ फोन हरवले आहेत. कधी कधी माणसं दुखावतात. कधी दुरावतात सुद्धा. आई कुठल्यातरी कार्यक्रमाला एका मामीला बोलवायला विसरली. म्हणून तिने अनेक वर्षे अबोला धरला होता. कुणाच्याही प्रयत्नांनी तो सुटत नव्हता. तो सुटला असाच एका ट्रॅजिक वेळेस… पण ते जाऊदे. माझ्या तैवानमधल्या एका मित्राची मला अचानक आठवण झाली, २७ वर्षानंतर. माझ्या पहिल्या परदेश दौऱ्यात तो भेटला. ८-९ दिवस एकत्र काम केलं. माझ्याच वयाचा. माझ्यासारख्याच दोन मुली असलेला. परत काही महिन्यांनी दुसऱ्यांदा तैवानला गेलो, तेव्हाही तोच बरोबर होता. नांव ‘बेन हुआ’. त्या काळात मोबाईल अगदीच नवे होते, त्यामुळे दोघांकडेही नव्हते. नंतर संपर्क तुटला. आता अचानक आठवण झाल्यावर त्याला नेटवर शोधायचा प्रयत्न केला, पण सापडला नाही. अनेक शंका मनात येऊन गेल्या. आता तो सापडेपर्यंत चैन पडणार नाही. विसरणं हे कधी कधी असं तापदायक होतं.
कधीकधी मात्र हे विसरणे-अविस्मरणीय असते. पूर्वी सवाईमध्ये भीमसेनजी नेहमी शनिवारी रात्री शेवटी, म्हणजे रविवारी पहाटेच गायला बसायचे. तिकीट काढलेले श्रोते तर असायचेच पण अनेक माणसे फक्त रविवारी पहाटे यायची, तेंव्हा तिकीट लागायचे नाही पण गर्दी इतकी व्हायची कि कित्येकांना उभे राहावे लागत असे. ते स्वर्गीय गाणे ऐकताना तहान, भूक, ऊन विसरून ४ तास उभे राहिलेले, कधी हातात दूध- भाजी करता घेतलेल्या पिशव्या घेऊन तसेच उभे राहिलेले लोक मी पाहिले आहेत. कारण त्यांचे गाणे संपेपर्यंत कधी कधी ९-९.३० वाजायचे.
आणि उतारवयात हे विसरणे गरजेचेच असते. मला वाटते मेंदूची रचनाच अशी असते की तो गतकाळातील वेदनादायक आठवणी, हालअपेष्टा, अपमान, दुःख, विरह यातना, फ्रस्ट्रेशन सगळे हळूहळू विसरून टाकतो. उरतो नॉस्टॅल्जिया- शाळेतली धमाल, कॉलेजमधले मित्रमैत्रिणी, यशस्वी-अयशस्वी प्रेमातले किस्से, पहिल्या जॉबचा पहिला दिवस, लग्नाचा दिवस, पहिल्या प्रमोशनचा दिवस (पुढची फारशी आठवत नाहीत), व्यवसाय करत असाल तर पहिली ऑर्डर, बाळाचा जन्म… सगळ्या सुंदर आठवणींचा कोलाज. हेच राहायला पाहिजे ना? तरंच आपण नवीन काही करू शकतो. नवीन काही शिकू शकतो. नवीन मित्र मैत्रिणी जोडू शकतो. नवीन गावे, नवीन देश पाहू शकतो. नाहीतर आयुष्य फक्त चरफडण्यात जाईल. आपल्याला आजूबाजूला असे काही जण दिसतातही. न विसरणे हा त्यांचा खरा आजार असतो का?
तुम्हाला काय वाटते?
Leave a Reply