एखादं नाव कधी लोकप्रिय होईल सांगता येत नाही. मी लहान असताना भावांची नावे, माझे आहे तसं, हेमंत, जयंत, वसंत, किंवा मुकुंद, मिलिंद, किंवा अजय, संजय, विजय म्हणजे साधी, पण तीन अक्षरी आणि यमक जुळेल अशा नावांचा सुळसुळाट होता. नंतर सुपरस्टार्सचा जमाना आला, मग अमित, राजेश, अशी नावं येऊ लागली (देव, दिलीप, राज हे जुने सुपरस्टार, पण महाराष्ट्रात दिलीप थोडं चाललं तरी देव आणि राजची फारशी फॅशन नव्हती. तसंच विनोद, शशी, शम्मी, धर्मेंद्र ही नावं उत्तर हिंदुस्थानी वाटल्याने महाराष्ट्रात फारशी चालली नाहीत. मग सुनील, सचिन, आले, तसंच बंगाली नावांची एक लाट आली – सलील, आशिष, अमोल… पण तीन अक्षराचं attraction काही जात नव्हतं. मला वाटतं कधी जाणारही नाही.
पण झुरळ लोकप्रिय होईल असं कधी वाटलं नव्हतं. अर्थात हेही नाव तीन अक्षरी आहे. पण झुरळ म्हणलं की पूर्वी बायका किंचाळायच्या, आता थेट gymnastics करत स्प्रे मारून त्याचा नायनाट करतात. पुरुष मात्र पूर्वी चपलेने किंवा पेपरने मारायचे, आजकाल पेपर विकत घेणं खूप कमी झालंय, पादत्राणे मात्र असंख्य असतात. त्यामुळे त्यांचा वापर चालूच आहे. मी रिमोटने झुरळाला मारल्याचं ऐकलंय, (म्हणजे रिमोटचा चपलेसारखा वापर करून), इतरही काही वस्तू वापरत असतील, पण एक वस्तू वापरणे हे अशक्य आहे. ती म्हणजे मोबाईल. मोबाईलचा वापर झुरळ मारण्याकरता याचा आपण विचारही करू शकत नाही. पूर्वी बायकोच्या सांगण्याप्रमाणे वागणाऱ्या नवऱ्यांना बाईल- बुद्धी म्हणत. आजकाल सगळेच मोबाईल बुद्धी झालेत.
पुन्हा विषयाकडे वळू. झुरळाचा प्रॉब्लेम म्हणजे तसं पाहिलं तर झुरळ नाव कॅची आहे. हॉटेलच्या नावात अशी गंमत केली की फॅशनेबल वाटतं, विशेषतः तरुणाईला. जवळपास 100 वर्षांपूर्वी आगाथा क्रिस्थी ने तिच्या एका कादंबरीत, लंडन मधल्या एका पबचं नाव ‘हेल’ [म्हणजे नरक] असं ठेवलं होतं. हा पब म्हणे, तरुणवर्गात [म्हणजे १०० वर्षांपूर्वीचे gen z] फार लोकप्रिय होता. मुंबईत फार जुनी आणि महाग अशी कंदील, copper chimney, नावाची रेस्टॉरंट आहेत. आजकाल तर अशी खूप आहेत. तसेच मिसळीला असंख्य विचित्र नावं आहेत, उदा. काटाकिर्र. अशी विचित्र नावांची फॅशन असली, तरीही झुरळ नावाचं रेस्टॉरंट चालेल असं वाटत नाही. इथे मुंढें च्या राज्यात हॉटेलात लपलेलं एक झुरळ चालत नाही, शिवाय लहानपणापासून आपण स्टोरीज ऐकतो – अनुभवतो. कुणीतरी कॉलेजच्या कँटीनमध्ये भाजीत झुरळ निघालं म्हणून खूप राडा केलेला असतो. कुणी बायोलॉजीमध्ये केलेल्या झुरळाच्या डीसेक्शन्स बद्दल बोलतो.
झुरळ हा तसा माणसाला सतत जवळ असणारा, तरी कायम नको असणारा प्राणी असतो, विशेषतः खाद्यपदार्थ, किचन, मोरी, प्लेट्स, डायनिंग टेबल, खुर्ची, या कशाच्या जवळ अजिबात नको असतो, त्यामुळे तिथेच ते येते हा भाग वेगळा. आणि आपल्याला कुठलीही आरोग्याशी निगडित गोष्ट आणि त्यात झुरळ ही कल्पनाच सहन होत नाही. आता हे वाक्य वाचताना सुद्धा काही जणांना शहारा आला असेल.
पण मग ‘झुरळ’ हे नाव हिट का झालं? मी माझ्यापरीने कारणमीमांसा लावायचा प्रयत्न करतोय.
पहिलं तर कारण सांगून झालं. कुठलीही विचित्र, शॉकिंग गोष्ट असेल तर तरुणाईला आवडते. सारखं तेच तेच करायचा कंटाळा येतो. मग सारखं भारताचं सगळं चांगलं चाललंय, हे झालं, ते झालं, लोकांना एवढ्या सुविधा मिळाल्या, ४९% लोकं extreme poverty बाहेर आली. इतका GDP वाढला हे गुणगान ऐकून कंटाळा येतो. थोडंसं विचित्र वागलं, ४ शिव्या दिल्या की बरं वाटतं. फार चांगलं वागून अजीर्ण झाले असेल तर मेंदू स्वचछ होतो. लगेच कुणीतरी ‘पूर्वी कसं आपल्याकडे सगळं होतं.’वाला म्हणेल की याच्याकरताच शिमग्याचा सण केला होता. खरं आहे, पण शिमगा वर्षातून एक दिवस कराचा असतो. ३६५ दिवस रोज नाही. असू दे. त्याबद्दल वेगळं बोलू.
कारण दुसरे – मध्यंतरी मी एका youtube व्हिडिओ वर पाहिलं की भारतात सुमारे ८ कोटी सुशिक्षित तरुण हे ‘काहीही करत नाहीत’- होय. ‘काहीही करत नाहीत.’ म्हणजे exactly काहीही नाही, असं नाही तर त्यातल्या कॅटेगरीज बघू. सुशिक्षित तरुण गृहिणी, MPSC /UPSC ला बसणारे तरुण तरुणी, वर्षानुवर्षे PHD च्या मागे लागलेले युवक, अमेरिकेकडे डोळे लावून बसलेले, अमेरिकेत शिक्षण पूर्ण झाल्यावर जॉब न मिळालेले, आणि खरेखुरे सुशिक्षित बेकार. लक्षात घ्या हे सगळे जण बऱ्यापैकी शिकलेले आहेत. त्यांचं घरचं बरं किंवा ठीक चाललं असलं तरी आज त्यांना स्वतःचं उत्पन्न नाही. कदाचित त्यांचे मित्र -मैत्रिणी चांगले पगार मिळवत असतील. काही जण अमेरिकेत असतील, काही जण इथेच पण ज्याला पॅकेज म्हणता येईल असे पगार मिळवत असतील. त्यांच्याशी तुलना केली कि, या काही ना करणाऱ्यांना असूया वाटत असेल. अर्थात काही मित्र ओला रिक्षाही चालवत असतील. आणि काही Blinkit चे डिलिव्हरी बॉईज पण असतील, पण त्यांच्याकडे कोण लक्ष देणार?
या सगळ्या काहीही ना करणाऱ्यांची काहीतरी तक्रार आहे, खरी आहे असं त्यांना वाटतंय, आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे.
कारण तिसरे – सोशल मीडिया. हे अत्यंत कॉम्प्लिकेटेड शस्त्र आहे. यात खरी बातमी, खोटी बातमी, खऱ्या खोट्याचं बेमालूम मिश्रण करणारी बातमी, अतिरंजित बातमी, इन्फ्लुएन्सर्स आणि एखाद्या गोष्टीचं हॅमरिंग, आणि या सगळ्याचा आपल्यावर होणारा परिणाम. आम्ही जेंव्हा तरुण होतो तेव्हा प्रॉब्लेम खूप जास्त होते. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर, काहीतरी काम मिळणं हेच बहुतेकाचं ध्येय असायचं. बातमीकरता आकाशवाणी किंवा पेपर हेच sources होते. TV जस्ट चालू झाला होता. तरीसुद्धा काही आंदोलनं होत होती. त्याआधी 10 वर्षे आणीबाणी येऊन गेली होती. पण आमचे influencers होते – खोटं का बोलू – फक्त्त filmstars. आज मात्र इन्फ्लुएन्सर्सचा सुळसुळाट झालाय. त्यातून एखादा किंवा एखादी दिसायला आणि बोलायला स्मार्ट असेल तर तो/ती सांगेल ते खरं वाटायला लागतं.
कारण चौथे – तुम्ही ‘हरे रामा हरे कृष्णा’ पाहिलाय का? तो देव आनंदने हिप्पी लोकांवर काढला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर 10-15 वर्षांनी युरोपमधली तरुणाई एकदम बिथरली होती. आपल्या बापांनी, काकांनी निष्कारण युद्ध करून आपल्या पिढीची वाट लावली, असे त्याना वाटे. त्यावरचा सूड म्हणून ही पिढी असं वागत होती.
‘दुनियाने हमको दिया क्या? हम सबकी पर्वा करे क्यूँ?’ ही वृत्ती झाली होती.
‘माझी काहीच जबाबदारी नाही. मी काहीही करीन. कसाही वागेन. कसलेही कपडे घालीन. ड्रग्ज घेईन. कुणाबरोबरही कधीही sex करीन. तुम्ही मला कोण विचारणारे?’ असे त्यांना वाटे. याला, swinging sixties म्हणतात.
आपल्या दुर्दैवाने हे लोण आपल्याकडे आज आलं आहे. त्याचं कारण, ही gen z त्यांच्या प्रॉब्लेम करता आपल्याला जबाबदार धरतेय. Irony पहा. आमच्या वेळेस, कॉलेजमधून बाहेर पडल्यावर 600-700 रुपयांची नोकरी मिळाली की आम्ही कृतकृत्य असू. आपल्या प्रॉब्लेमकरता आपला बाप जबाबदार आहे असं कुणालाही वाटत नव्हतं. उलट त्याने केलेला त्यागच सर्वांना दिसायचा. कारण बऱ्याचवेळेस बापाचा पगारही २-२५०० रुपयेच असायचा. आज बापाचा पगार 75-80 हजार असतो. आणि पोराला बापापेक्षा जास्त पॅकेज मिळालं नाही तर दोघांनाही, ही बापाचीच चूक असं वाटतं. अतिशयोक्ती सोडून द्या. मुद्दा लक्षात घ्या.
चार कारणे झाल्यावर पाचवे पाहिजेच ना? मात्र हे शेवटचे. पहिली चारही करणे झुरळांच्या विरोधातली म्हणा, किंवा त्यातल्या चुका दाखवणारी होती. पण असे कधीच नसते. या झुरळांचे काही मुद्दे बरोबरच आहेत, थोडे असतील पण आहेत. पेपर फुटीवरून इतका आरडाओरडा झाल्यावर सरकारने काही बदल केले. म्हणजे त्रास खरा होता. असे इतर छोटे मोठे त्रास समस्या आहेतच, आणि तरुणच नाही तर अनेक मध्यमवयीन आणि वृद्धांना सुद्धा काही मुद्द्यात तथ्य वाटते.
या ब्लॉगचा उद्देश हा पूर्णपणे अराजकीय आहे. केवळ काही गोष्टींकडे वेगळ्या चष्म्यातून म्हणा किंवा चष्मा काढून म्हणा, बघण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या मागचं राजकारण, बाहर की ताकतें, Hidden Agenda वगैरे मुद्दे यामध्ये येत नाहीत आणि येणारही नाहीत.
माझं मत आहे कि झुरळांना लाल हिटने मारायचं कि काळ्या हिटने हा मुद्दा short term आहे. Long term मुद्दे असे आहेत.
सरकारी नोकरी, निमसरकारी नोकरी किंवा बॅंकेतली नोकरी हे काही जीवनाचं सर्वस्व असू शकत नाही. एक तर त्यांची संख्या तरुणाईच्या मानाने खूप कमी आहे आणि बाईक घेऊन कसली तरी डिलिव्हरी द्यायची हे काम सुद्धा मर्यादित आहे आणि हे एका वयानंतर करणे अवघड. AI च्या काळात सुद्धा इतर अनेक क्षेत्रं आहेत कि जिथे आज आणि भविष्यात काम उपलब्ध असणार आहे, वाढत जाणार आहे. फक्त तिथे काही स्किल्स शिकायला लागतील आणि श्रम करावे लागतील. व्हाईट कॉलर आणि ब्लू कॉलर नोकऱ्यांबद्दल वेगळा विचार करायची आता गरज आहे. जेव्हा आईबाप अभिमानाने सांगतील की माझा मुलगा plumber आहे किंवा drone mechanic आहे, तो दिवस यायची गरज आहे.
ब्लॉग जरा मोठा होतोय, एक मुद्दा सांगितल्याशिवाय पूर्ण होणार नाही. सोशल मीडिया. याचा फायदा आहेच, पण त्यामुळे होणारं नुकसानही तितकंच भयंकर आहे. यावर उपाय काय हे मला माहित नाही, पण काहीतरी करायलाच पाहिजे हे नक्की.
तुम्हाला काही सुचतंय का बघा.
Leave a Reply